रविवार, २ ऑगस्ट, २०१५

शिस्त

आजकालच्या मुलांना अजिबात शिस्त नाही ! अहो वाट्टेल तस बोलतात, लहान - मोठं काही काही बघत नाहीत. अशा प्रकारची वाक्ये नेहमीच कानावर पडत असतात. आता या वाक्याच नवल वाटत नाही पण मनातील उत्सुकता डोक वर काढते. कोठून शिकतात ही मुलं असं वागायला आणि बोलायला ? मुळातच ही मुलं बेशिस्त आहेत का? खरतर नाही. मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागल्या पासून दोन गोष्टी लक्षात आल्या, एक म्हणजे आपल्या पैकी प्रत्येकाला स्वयंशिस्त असते आणि दुसरी म्हणजे मुले ही अनुकरणप्रिय असतात. मूल लहानाचे मोठे होत असते तेव्हा त्याची वाढ ठराविक पद्धतीने होत असते. सगळीच लहान मुलं आधी कुशीवर वळतात, मग पालथी पडतात, घोडा घोडा करतात, हळूहळू उभे रहायला लागतात, चालायला लागतात आणि नंतर धावायला लागतात. अस कधीतरी दिसत का की ६-७ महिन्यांच मूल एकदम धावायला लागले ? किंवा आपल्याला लहान मुलांना कधी शिकवायला लागते का की पालथे पडल्या नंतर त्याला घोडा घोडा करायचा आहे नंतर उभे रहायचे आहे. नाही, ही स्वयंशिस्त आहे. निसर्गाने च ही स्वयंशिस्त आपल्याला दिलेली आहे. मग पुढे अस काय होतं की आपण ही शिस्त विसरून जातो? सध्या माझ्या वाचनात जे. कृष्णमुर्ती यांचे What does Freedom mean? हे पुस्तक आले. हे पुस्तक त्यांनी मुलांसाठी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "Freedom and Order go hand in hand." आता इथे order म्हणजे क्रमवारी. या पुस्तकात ते सांगतात आपण जर आपल्या नेहमीच्या कामांची किंवा आपल्या दैनंदिन गोष्टींची क्रमवारी केलेली असेल तर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. आणि मग कोणालाच आपल्याला सांगावं लागत नाही की आपण कधी काय करायला पाहिजे. त्यामुळे सहाजिकच मुलांना त्यांच्या गोष्टी करण्याच स्वातंत्र्य मिळते. खरंच किती सोपी आणि साधी गोष्ट आहे ही. यालाच तर म्हणतात स्वयंशिस्त !! हे जर मुलांना जमले तर नक्कीच त्यांना याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होईल. पण हे मुलांना शिकवून येईल का? कारण शिकवून लागणारी शिस्त ही सांगकाम्यासारखी असते. मग याला सोपा उपाय कोणता? आपण सर्वसामान्यपणे बघतो की घरातील मोठी माणसं सतत लहान मुलांच्या मागे लागतात कसं वागायच, कसं बोलायचं, काय कराव काय करु नये वगैरे वगैरे. पण हे सगळं सांगत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती म्हणजे मुलं लहानपणापासून अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील मोठी माणसं जसं वागतात त्याच परिणाम लहान मुलांवर होत असतो. बहुतांश वेळा असं दिसून येत की मोठी माणसं देत असलेली शिकवण आणि त्यांची स्वतःची वागणूक हे अगदी परस्पर विरोधी असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, बऱ्याच लोकांच्या घरी घडणारा साधा प्रसंग. घरी फोन वाजतो, घरातील लहान मूल फोन उचलते. आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलायचं नसेल तर आपण मुलाला सांगतो "मी घरी नाही म्हणून सांग." म्हणजे आपण त्यांना खोटं बोलायला सांगतो. पण मुलांवर चांगले संस्कार करायचे या हेतूने आपली शिकवण असते कधीही खोटं बोलू नये. किती परस्पर विरोधाभास आहे हा !! म्हणजे मुलांमध्ये उपजतच असलेली स्वयंशिस्त जर आपल्याला जपायची असेल तर तसा पोषक वातावरण मुलांना देण्याची जबाबदारी आपल्या मोठया माणसांची आहे. आणि हे जर आपण करु शकलो तर मुलांची वागण्या-बोलण्याची पद्धत तर सुधारेलच पण त्याचबरोबर मोठया माणसांमध्ये सुद्धा बदल झालेला जाणवेल. आणि याचा एकत्रित परिणाम आपोआप समाजावर झालेला दिसेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा