शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

BREAK

'फिर मिलेंगे एक छोटेसे ब्रेक के बाद' हे वाक्य आपल्या परिचयाचे आहे. पण एखादा चांगला कार्यक्रम टी. व्ही. वर चालू असताना जर ब्रेक आला तर आपल्याला आवडत नाही. अस वाटत कशासाठी इथे ब्रेक आहे ? टी. व्ही. वरील कार्यक्रमांमधे प्रयोजकांच्या जाहिराती असतात म्हणून ब्रेक असतो.
पण आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला ब्रेक खूप महत्वाचा वाटतो. रोजच ठरलेल साचेबद्ध आयुष्य जगताना किंवा रोजची कामे करताना, मग ती घरातली असोत वा बाहेरची, आपल्याला दमून गेल्यासारखे वाटते. तेव्हा अस वाटत की फार नाही पण दोन एक दिवसांची तरी विश्रांती म्हणजेच ब्रेक हवा. नेहमीच्या ठरलेल्या कामांपेक्षा काहीतरी वेगळ कराव अस वाटत. अस काहीतरी ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि विश्रांतीसुद्धा मिळेल. थोडक्यात, एक छोटासा का होईना ब्रेक हवा असे वाटते.
आज आई, सून, मुलगी, बायको, शिवाय घराबहेरील व्यावसायिक आयुष्यातील जबाबदारी सांभाळाताना अस वाटत की अधून मधून छोटे छोटे विरंगुळ्याचे क्षण आपल्याला मिळायला हवेत. हे क्षण आपल्याला एक वेगळीच उर्जा देऊन जातात. प्रत्येकाची विरंगुळ्याची कल्पना वेगवेगळी असु शकते. काही जणांना काहीही न करता घरात बसून विश्रांती घ्यावी अस वाटत, कोणाला खरेदी करायला, कोणाला फिरायला जावे असे वाटत असेल. जे करून आपल्याला बर वाटेल अस काहीतरी.
माझ्यासाठी विरंगुळा म्हणजे मैत्रीणिंबरोबर भरपूर भटकणे, खूप खूप गप्पा मारणे आणि मनसोक्त हसता येणे, निरागस लहान मुलाप्रमाणे वागता येणे. आपण मोठे झालो की आपल्यातले लहान मूल हरवून जाते. आपल्यातील सृजनशीलता, खेळकरपणा, कुतूहल, मनमोकळेपणा हे सगळ आपण आपल्या जबाबदार्यांमधे हरवून बसतो. आणि मोठेपणाचा मुखवटा चढवून, मोठेपणाचा आव आणून वावरत असतो. त्यामुळे असे छोटे छोटे ब्रेक मिळाले की आपण स्वतःच्या जवळ येतो आणि आपल्याला नवनवीन गोष्टी करण्याची नवीन उमेद  मिळते.
असे छोटे छोटे ब्रेक घेत जर आपण आपल्या आयुष्याची गाडी विचारपूर्वक चालवली तर नक्कीच AVERAGE चांगले मिळेल.


सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

निसर्गसौंदर्य

अप्रतिम निसर्गसौंदर्य म्हणजे काय हे आज जाणवले. एक क्षण मनात येऊन गेले स्वर्ग म्हणजे बहुतेक असेच काहीतरी असावे. उटी ते कोडाई कनालचा प्रवास करताना जे सौंदर्य अनुभवले आहे ते शब्दांत लिहीणे कठीण आहे. मला कधीच प्रवास करताना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची घाई नसते. त्यापेक्षा प्रवासाचा आनंद घेणे मला जास्त आवडते. त्यामुळे आज उटी ते कोडाई या प्रवासाचा पुरेपूर आनंद अनुभवता आला. हा प्रवास जवळजवळ 250 कि. मी. आहे. पण त्यात शेवटचे 60 कि. मी. पूर्णपणे घाट आहे. खरतर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांग असल्याने घाटातून प्रवास करण्याची सवय आपल्याला असतेच. पण इथले घाट खूप वेगळे वाटले. सह्याद्रीच्या सौंदर्यात एक रांगडे पणा जाणवतो. पण उटीची निलगीरी पर्वत रांग आणि कोडाई ची पळनी पर्वत रांग यात एक वेगळी नजाकत जाणवली. सगळ्यात महत्त्वाचे हे पर्वत खूप हिरवेगार आहेत. येथील रहिवाशांना विचारले असता असे समजले की या भागात मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने वगळता इतर वेळी अधूनमधून पाऊस पडतोच. त्यामुळे ही पर्वत रांग कायमच हिरवीगार असते असे म्हणता येईल. या वर्षी तर मे महिन्यातही पाऊस पडला. या पर्वतांची ऊंची देखील जास्त आहे. पण घाट चढताना ही ऊंची जाणवू न देण्याची खबरदारी पण हे पर्वतच घेतात. हे पर्वत अगदी अलगद पणे त्यांच्या कुशीत घेऊन आपल्याला वर पर्यंत आणून पोहचवतात. या घाटातील सौंदर्य आपल्याला मोहित करून टाकते. मधूनच येणारा जोरदार पाऊस आणि क्षणात पाऊस थांबून पडणारे ऊन हे या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. आज तर या ऊन - पावसाच्या खेळात आम्हाला सुंदर इंद्रधनुष्य बघायला मिळाले. मी या पूर्वी एवढे मोठे इंद्रधनुष्य कधीच बघितले नव्हते. अगदी एखाद्या चित्रकाराने त्याच्या चित्रात रंगविल्याप्रमाणे ते इंद्रधनुष्य आपले सगळे रंग चमकवत दिमाखात पसरले होते. 

खरोखरच आपण एका वेगळ्याच जगात आहोत असे वाटले.

वडिल - मुलीचे नाते.

अनिल काका (बाबा) आणि मुक्ता यांना मी गेली 14 वर्षे  ओळखत आहे . खरतर ओळखत आहे पेक्षा मला ते 14 वर्षाँपासून माहिती आहेत आणि प्रत्येक वेळी काही ना काही प्रसंगाने मला त्यांची नव्याने ओळख होते असे म्हणणे योग्य होईल.
काल वसंत व्याख्यानमाला या कार्यक्रमात बाबा आणि मुक्ताची मुलाखत होती. या दोघांची मुलाखत म्हटल्यावर व्यसनमुक्ती हा विषय सर्वप्रथम डोक्यात येतो. परंतु कालच्या मुलाखतीचा केंद्रबिंदू होता वडिल - मुलीचे नाते.

मी मुलांबरोबर काम करत असल्याने बऱ्याच वेळा मुलांच्या पालकांशी बोलायची वेळ येते. मुले कशी अनुकरण करत शिकत असतात, त्यासाठी मोठया माणसांचे वागणे कसे असावे, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी सांगाव्या लागतात. पण काल बाबाने सांगितलेल्या एका गोष्टीने वेगळा दृष्टिकोन दिला, ती म्हणजे मुलांना केंद्रस्थानी ठेवून केलेली घराची रचना आणि त्याप्रमाणे असलेले घरातले वातावरण. घरातील प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात मुलांचे मत विचारात घेणे, मुलांचे निर्णय त्यांचे त्यांना घेउ देण्याचे स्वातंत्र्य, मुलांना दिलेला Quality Time, मुलं चुकत असतील तर त्यांच्यावर आरडाओरडा न करता संयम ठेवून त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे, या गोष्टी फक्त समुपदेशनापुरत्या मर्यादित नसून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणारे बाबा आणि सुनंदा मावशी यांची काल नव्याने ओळख झाली. मी सुनंदा मावशीला कधी भेटले नाही पण तरीही ती 
खूप ओळखीची वाटते. 

याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आई - वडिलांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचे आणि दिलेल्या स्वातंत्र्याचे सार्थक करणाऱ्या मुक्ता आणि यशो या दोघीजणी.

या मुलाखती नंतर, आपल्याला पण आपल्या मुलांना असे समृद्ध बालपण देता येईल का? असा प्रश्न मला नक्कीच पडला. पण त्याचे ठामपणे 'हो' असे उत्तर देता येत नाही. पण चांगले पालकत्व कसे असावे यासाठी कालच्या मुलाखती मुळे उत्तम मार्गदर्शन नक्की मिळाले.

पोलिस


पोलिस म्हटले की आपल्या कल्पनेत असणारी प्रतिमा ही बऱ्याच वेळा नकारात्मक असते. परंतु ही प्रतिमा आपल्या स्वानुभावापेक्षा सिनेमा, सिरियल, वर्तमानपत्रे या सर्व मिडिया जगतातून तयार झालेली असते. आज मुक्तांगण मध्ये डी. सी. पी. मनोज पाटील रुग्ण मित्रांशी गप्पा मारण्यासाठी आले होते. ही मुलाखत ऐकताना असे जाणवले की समाजात पोलिसांविषयी किती चुकीचा uसमज आहे. डी. सी. पी. सरांनी सांगितलेली एक गोष्ट मनापासून पटली, ते म्हणाले समाजात प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसं असतात. त्याचप्रमाणे पोलिस क्षेत्रातही असतात. पण त्यामुळे पूर्ण पोलिस खाते वाईट असं म्हणून कसं चालेल ? 

अगदी योग्य आहे त्यांचे म्हणणे. समाजात बरीचशी माणसं काठावर बसून कसं  पोहायच याचे धडे देतात. पण धाडस करून उडी मारणारे फारच कमी असतात.

डी. सी. पी. सरांनी त्यांच्या विभागात सुरू केलेला एक नविन उपक्रम "निर्भय विद्यार्थी अभियान" या विषयी माहिती दिली. आज त्यांच्या विभागात असलेल्या बहुतांश N. G. O. आणि शाळा या निर्भय विद्यार्थी अभियानात सहभागी झाले आहेत. या अभियानात मुला-मुलीँना समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याचे साहस मिळते. बहुतांश तक्रार केलेल्या प्रकरणात कार्यवाही केली जाते. आणि विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते.त्यामुळे तक्रार करणाऱ्याला भिती नसते. 

आज ही मुलाखत ऐकून असे वाटले की सर्व प्रकारच्या मिडियाने पोलिस क्षेत्राबद्दल शक्य तेवढ्या सकारात्मक गोष्टी लिहायला आणि दाखवायला पाहिजेत. जेणे करून समाजात पोलिसांबाबत विश्वास निर्माण होईल. त्याचा फायदा आपल्या समाजालाच होणार आहे. 

डी. सी. पी. मनोज पाटील यांच्यासारखे अजूनही बरेच पोलिस अधिकारी असतील जे वेगवेगळे  आभिनव प्रयोग करून समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करत असतील. आपण नागरिकांनी त्यांना 
जमेल तेवढे व जमेल तसे सहकार्य करणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

शिस्त

आजकालच्या मुलांना अजिबात शिस्त नाही ! अहो वाट्टेल तस बोलतात, लहान - मोठं काही काही बघत नाहीत. अशा प्रकारची वाक्ये नेहमीच कानावर पडत असतात. आता या वाक्याच नवल वाटत नाही पण मनातील उत्सुकता डोक वर काढते. कोठून शिकतात ही मुलं असं वागायला आणि बोलायला ? मुळातच ही मुलं बेशिस्त आहेत का? खरतर नाही. मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागल्या पासून दोन गोष्टी लक्षात आल्या, एक म्हणजे आपल्या पैकी प्रत्येकाला स्वयंशिस्त असते आणि दुसरी म्हणजे मुले ही अनुकरणप्रिय असतात. मूल लहानाचे मोठे होत असते तेव्हा त्याची वाढ ठराविक पद्धतीने होत असते. सगळीच लहान मुलं आधी कुशीवर वळतात, मग पालथी पडतात, घोडा घोडा करतात, हळूहळू उभे रहायला लागतात, चालायला लागतात आणि नंतर धावायला लागतात. अस कधीतरी दिसत का की ६-७ महिन्यांच मूल एकदम धावायला लागले ? किंवा आपल्याला लहान मुलांना कधी शिकवायला लागते का की पालथे पडल्या नंतर त्याला घोडा घोडा करायचा आहे नंतर उभे रहायचे आहे. नाही, ही स्वयंशिस्त आहे. निसर्गाने च ही स्वयंशिस्त आपल्याला दिलेली आहे. मग पुढे अस काय होतं की आपण ही शिस्त विसरून जातो? सध्या माझ्या वाचनात जे. कृष्णमुर्ती यांचे What does Freedom mean? हे पुस्तक आले. हे पुस्तक त्यांनी मुलांसाठी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "Freedom and Order go hand in hand." आता इथे order म्हणजे क्रमवारी. या पुस्तकात ते सांगतात आपण जर आपल्या नेहमीच्या कामांची किंवा आपल्या दैनंदिन गोष्टींची क्रमवारी केलेली असेल तर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. आणि मग कोणालाच आपल्याला सांगावं लागत नाही की आपण कधी काय करायला पाहिजे. त्यामुळे सहाजिकच मुलांना त्यांच्या गोष्टी करण्याच स्वातंत्र्य मिळते. खरंच किती सोपी आणि साधी गोष्ट आहे ही. यालाच तर म्हणतात स्वयंशिस्त !! हे जर मुलांना जमले तर नक्कीच त्यांना याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होईल. पण हे मुलांना शिकवून येईल का? कारण शिकवून लागणारी शिस्त ही सांगकाम्यासारखी असते. मग याला सोपा उपाय कोणता? आपण सर्वसामान्यपणे बघतो की घरातील मोठी माणसं सतत लहान मुलांच्या मागे लागतात कसं वागायच, कसं बोलायचं, काय कराव काय करु नये वगैरे वगैरे. पण हे सगळं सांगत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती म्हणजे मुलं लहानपणापासून अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे घरातील मोठी माणसं जसं वागतात त्याच परिणाम लहान मुलांवर होत असतो. बहुतांश वेळा असं दिसून येत की मोठी माणसं देत असलेली शिकवण आणि त्यांची स्वतःची वागणूक हे अगदी परस्पर विरोधी असते. उदाहरणच द्यायचे झाले तर, बऱ्याच लोकांच्या घरी घडणारा साधा प्रसंग. घरी फोन वाजतो, घरातील लहान मूल फोन उचलते. आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलायचं नसेल तर आपण मुलाला सांगतो "मी घरी नाही म्हणून सांग." म्हणजे आपण त्यांना खोटं बोलायला सांगतो. पण मुलांवर चांगले संस्कार करायचे या हेतूने आपली शिकवण असते कधीही खोटं बोलू नये. किती परस्पर विरोधाभास आहे हा !! म्हणजे मुलांमध्ये उपजतच असलेली स्वयंशिस्त जर आपल्याला जपायची असेल तर तसा पोषक वातावरण मुलांना देण्याची जबाबदारी आपल्या मोठया माणसांची आहे. आणि हे जर आपण करु शकलो तर मुलांची वागण्या-बोलण्याची पद्धत तर सुधारेलच पण त्याचबरोबर मोठया माणसांमध्ये सुद्धा बदल झालेला जाणवेल. आणि याचा एकत्रित परिणाम आपोआप समाजावर झालेला दिसेल

शोधग्राम

"शोधग्राम", डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी वसवीलेल एक छोटस गाव. गडचिरोली गावापासून १७ की. मी. अंतरावर असलेल एक अभूतपूर्व गाव.
आयुष्यात काही माणसांना एकदा तरी भेटता यावे अशी इच्छा असते. माझी तर अस कोणकोणाला भेटायचे त्याची यादीच तयार झाली आहे. माझ्या या यादीमध्ये दोन नाव होती डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग. या दांपात्याबद्दल मी बरच वाचल होत, ऐकल होत. त्यांनी स्थापन केलेली संस्था "सर्च". ही संस्था स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश असा की आदिवासी लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषय जागरुकता निर्माण करणे आणि आरोग्य विषयक सोयी त्यांना उपलब्ध करून  देणे. त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. मुक्तामुळे ही संधी मिळाली.
गडचिरोली पासून जवळच असलेल एक वेगळच गाव. हमरसत्यावर "शोधग्राम" ची पाटी दिसली आणि तिथून डावीकडे वळले की काही अंतरावरच शोधग्रामचे प्रमुख द्वार दिसते. अतिशय कलात्मक कमान आणि तसाच कलात्मक प्रमुख दरवाजा! या प्रमुख दरवाजातून थोडेसे आत आल्यानंतर एक मोठा चौक आहे. आत येणारा हा रस्ता या परिसराला दोन भागात विभगतो. उजवीकडील भाग हा सगळा रहिवासी भाग आहे आणि डावीकडे दवाखाना, लायब्ररी, हॉस्पिटल असे कामाचे विभाग. येथील बांधकाम अतिशय सुबक आणि साधे पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ. बंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना सेवाग्राम सारखा साधेपणा या ठिकाणी अपेक्षित होता त्याचप्रमाणे ते म्हणाले माझा आदिवासी इथे आल्यानंतर त्याला, आपण आपल्याच परिसरात असल्यासारखे वाटले पाहिजे. अशा या दोन कल्पनांच्या संगमाचा हा अविष्कार आहे. एकसारखेपणा हे देखील या बांधकामाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्ट या दांपत्याने खूप विचार करून केलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बैठी घरे आहेत. भरपूर झाडे आहेत. या परिसरात मध्यभागी डॉ. बंग यांचे वडील, ठाकूरदास बंग, यांच्या स्मृतीनिमित्त एक स्मृतिचिन्ह म्हणून एक चरखा ठेवलेला आहे. या स्मृतिचिन्हामुळे या जागेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाल्यासारखे वाटते.
आम्ही आत आल्यावर इथल्या वातावरणात भरपूर Positive Energy असल्याचे जाणविले. खूपच प्रसन्नता जाणवली. येथील प्रत्येकजण अतिशय हसतमुख आणि नम्र आहे. आपोआपच आपल्यातही एक प्रकारची नम्रता आणि सकारात्मक उत्साह आल्यासारखे वाटते. आम्ही साधारण १२.३० वाजता शोधग्राम मध्ये पोचलो मग जेवण करून डॉ. बंग यांच्या घरी गेलो. डॉ. राणी बंग या बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यांच्या घरात गेल्यावर मला आपल्या मराठी म्हणी किती नेमक्या बनविलेल्या आहेत याची प्रचिती आली. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी." खरोखरच इतक्या साधेपणाने पण उत्तमप्रकारे कस रहाव हे या लोकांकडून शिकाव. अर्धा तास डॉ. बंग यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारुन आम्ही बाहेर पडलो. मग अमृत बंग,  डॉ. बंग यांचा मुलगा, याने आयोजित केलेल्या 'निर्माण' या कार्यशाळेत मुक्ता व्यसनमुक्ती आणि मुक्तांगण या विषयावर बोलणार होती. मुक्ताने अतिशय उत्तम प्रकारे या कार्यशाळेतील तरुण-तरुणींना या विषयावर माहिती दिली.
रोज संध्याकाळी ६.४५ वाजता इथे प्रार्थना असते. त्या वेळी सर्व शोधग्रामवासी प्रार्थानेला एकत्र येतात.  प्रार्थना झाल्यानंतर डॉ. बंग यांनी माझी आणि मुक्ताची सर्व शोधग्राम वासियांना ओळख करून दिली. ज्या प्रकारे त्यांनी आमची ओळख करून दिली मला तर वाटल की आपण खूपच काहीतरी मोठे काम करत आहोत. आपल्यालाच आपले कौतुक वाटते. त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग डॉ. बंग यांच्याबरोबर बराच वेळ घालवायला मिळाला. खूप वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायला मिळाली. सर्च चा सुरुवातीचा काळ, तेव्हाची आव्हाने, आत्ताची नवीन आव्हाने, एक ना अनेक अशा सर्व गोष्टींवर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो.  सध्याचे सर्च समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे तंबाखूचे व्यसन. या व्यसनाचे सर्वात कमीत कमी वय म्हणजे वय वर्षे ५. इतक्या लहान वयाची मुले तंबाखूचे व्यसन करतात.
दुसर्‍या दिवशी सर्च चे एक डॉक्टर आम्हाला जवळच्याच एका गावात घेऊन गेले. तिथे आम्ही एका घरात एका बाईंना भेटायला गेलो. आत जाताना एक पाटी वाचली, 'ग्राम आरोग्य सेवा - प्रशिक्षित स्त्री आरोग्यदूत.' या पाटीचा अर्थ आधी लक्षात आला नाही. आत गेल्यावर त्या डॉक्टरांनी एका साध्या नउवारी लुगड नेसलेल्या स्त्रीची ओळख करून दिली, ही स्त्री त्या गावाची आरोग्यदूत आहे. ते म्हणाले गडचिरोलीच्या आसपासच्या जवळजवळ ४० गावात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचे कारण एकतर यांची प्रसुति घरीच होते. त्या वेळेस जर काही त्रास झाला तर बाळ जाण्याची शक्यता असते, तसेच अनेक अंधश्रद्धा आणि चुकीच्या पारंपारीक गोष्टींमुळे बाळाची आणि आईची योग्या प्रकारे काळजी घेतली जात नाही. म्हणून सर्च ने या ४० गावातून ४० बायका निवडल्या, ज्यांना लिहिता वाचता येत होते आणि ज्यांना स्वतःची मुले आहेत. मग या सर्वांना सर्चच्या टीम ने लहान बाळाची हॉस्पिटलमधे जशी काळजी घेतली जाते त्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले. यात त्यांना बाळाचे वजन करणे, बाळाला इन्जेक्शन देणे, शिवाय एखादे बाळ जर बालंपनात गुदमरले असेल तर त्याला कसे वाचवायचे या सर्व गोष्टींचे उत्तम प्रशिक्षण दिले. यांना  स्त्री  आरोग्यदूत असे म्हणतात. या ४० गावांमधे १९९४ पासून सर्च च्या स्त्री आरोग्यदूत काम करायला लागल्या आणि आजतगायत या ४० आरोग्यदूत सर्च चे हे अनमोल कार्य अविरतपणे करीत आहेत. आज या ४० गावातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ६३% ने कमी झाले आहे. किती मोठे यश आहे हे !!!
नंतर आम्ही शोधग्राममधील हॉस्पिटल बघितले. माझ्या आजपर्यंतच्या बघण्यातील हे पहिलेच हॉस्पिटल असे आहे की जे हॉस्पिटल सारखे वाटतच नाही. याची रचनादेखील आदिवसीना केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. येथील खोल्या म्हणजे छोट्या छोट्या कुटी आहेत जिथे आदिवासी पेशंट आपल्या नातेवाईकासोबत राहू शकतो. कारण डॉ. बंग याना असे जाणविले की आदिवासी आपला पेशंट हॉस्पिटल मधे ठेवत नाही कारण त्याला असुरक्षित वाटते. पण या सोयीमुळे तो प्रश्नच मिटला. या हॉस्पिटलमधे Pathology Lab, ECG, Sonography, Dental clinic,  असे सर्वकाही आहे. त्याचप्रमाणे इथे Planned Surgeries होतात. म्हणजे दर २-३ महिन्यांनी पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणहून डॉक्टर्स इथे येतात आणि हर्निया पासून ते अगदी स्पाइन सर्जरी पर्यंत सगळ्या सर्जरी येथे करतात. खरोखरच आपल्या विचारापालीकडचे हे समाजकार्य आहे.
आदिवासींमधे राहून त्यांना काय समस्या आहेत त्या शोधून काढायाच्या आणि मग त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा  करायची. हे या दांपत्याचे काम खरोखरच निःशब्द करून टाकणारे आहे. या कामात त्यांना साथ देणारी आनंद आणि अमृत ही त्यांची दोन मुले आणि सर्च ची टीम सुद्धा तितक्याच निष्ठेने हे समाजकार्य करते आहे.
डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग आणि त्यांची सर्च ची टीम यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा.