परवा सकाळी माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, अग
आता मुलांना शाळेला सुट्टी दिली आहे, क्लासेस बंद, सर्व अॅक्टीव्हिटीज बंद,
त्यामुळे माझ्या मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी काय करू ते सांग.
बहुतेक तरी हा प्रश्न सध्या बऱ्याच पालकांना
पडलेला असणार. कारण नेहमीची सुट्टी आणि आत्ताची सुट्टी यात खूप फरक आहे. या
सुट्टीमध्ये मुलांना कुठेही बाहेर पाठवता येत नाही, मुला-मुलांना एकत्र खेळता येत
नाही. त्यामुळे ही मुलं, जी लहान आहेत ती घरी आई वडिलांच्या मागे भुणभुण करतात.
आणि जरा मोठी मुलं असतील तर पालकांचा सूर असा असतो की, मुलं दिवसभर काहीही करत
नाहीत, फक्त कोणत्या न कोणत्या स्क्रीन (मोबाईल, लॅपटॉप, टी.व्ही.) समोर तासन तास
बसलेली असतात.
आपण मुलांना सारखं अरे, मोबाईल खेळू नको, टी.
व्ही. बघू नको, व्हिडीओ गेम खेळू नको, माझ्या मागे लागू नको, असे नकारात्मक सल्ले
देत असतो, अर्थात काहीतरी कर असं पण सांगतो, पण नक्की काय हे मात्र सांगत नाही
किंवा सांगितलं तरी बऱ्याचवेळा आपल्या मते जे चांगलं तेच सांगतो, त्यांना काय
आवडेल किंवा attractive वाटेल याचा विचार कदाचित थोडा कमी पडतो.
जरा थोडसं आपल्या बालपणात डोकावून बघूया का? आपण
लहान असताना कुठे होते मोबाईल, व्हिडिओ गेम, किंवा आत्तासारखे टी.व्ही. वरती सततचे
कार्यक्रम. पण तरीही आपलं बालपण छान गेलंच की! अर्थात इथे एक सावधगिरी बाळगावी
लागेल, ती म्हणजे, तुम्ही जर हे वक्तव्य समजा तुमच्या मुलांसमोर केलत तर खेळ सुरु
व्हायच्या आधीच संपेल बर का. आपण जे काही वर म्हटलं ते फक्त आपल्या उजळणीसाठी.
बरं, या सर्वांबरोबर अजून एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या पालकांकडून
मिळाली ती म्हणजे त्यांचा ‘छान’ वेळ. ‘छान’ हे खूप महत्वाचं आहे. आपण सध्या बघितलं
तर बरेचसे पालक हे त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना इच्छा असून
देखील हा छान वेळ त्यांच्या मुलांना तर नाहीच पण स्वतःला पण देता येत नाही.
त्यामुळे आता ही मिळालेली सुट्टी आहे त्याचा छान
उपयोग कसा करता येईल याचा विचार करूयात. आणि त्याचबरोबर या वायरस शी लढण्यासाठी एक
सकारात्मक उर्जा आजूबाजूला निर्माण करूया. बघूया बरं काय काय करता येईल ते!
कदाचित, सध्याच्या बऱ्याच मुलांना आपण पालक,
लहानपणी सुट्टीत दुपारी बाहेर जायला मिळायचं नाही म्हणून कितीतरी वेगवेगळे बैठे
खेळ खेळायचो ते माहितही नसतील. तर त्यांना या खेळांची ओळख करून देऊ.
त्यानिमित्ताने आपणही आपलं बालपण परत जगू. आठवत आहेत का काही खेळ? पत्त्यांचे
निरनिराळे प्रकार, कॅरम, कानगोष्टी, लपवलेली गोष्ट शोधून काढणे, स्मृती खेळ,
शिवाजी म्हणतो, भेंड्या, नावं-गाव-फळ-फुल (सध्याची मुलं याला name,
place, animal, thing म्हणतात). आठवायला सुरुवात केली की अजूनही पुष्कळ मिळतील.
रोज एक नवीन खेळ शोधून तो एकत्र बसून खेळुयात. कधी पालकांच्या लहानपणीचे तर कधी
आपल्या मुलांच्या वेळेस नवीन आलेले खेळ त्यांच्याकडून शिकून घेऊ आणि खेळू. कधी कधी
पालकांनी विद्यार्थ्याची भूमिका घेतली की मुलांना आनंद होतो.
आपल्या बऱ्याच घरांमधून सध्या काम करणाऱ्या
बायका, घरातील वरची कामे, साफसफाई हे करताना दिसतात. सध्या आपल्या या बायकांना
सुद्धा सुट्टी द्यावी लागलेली आहे. मग याचा फायदा कसा करून घेता येईल? आपण आपल्या
मुलांची मदत घेऊन ही कामं करू शकतो का? ही साफसफाई करताना काही जुन्या गोष्टी
सापडतील, कदाचित. उदाहरणार्थ, जुने फोटो, काही जुनी पत्र (जेव्हा इमेल नव्हते),
काही खास जपून ठेवलेल्या गोष्टी, आणि मग या प्रत्येक गोष्टीबरोबर असलेली
प्रत्येकाची वेगवेगळी आठवण. या आठवणी एकमेकांना सांगून त्यांना उजाळा देऊया.
स्वयंपाक घरात नवनवीन पदार्थ मुलांची मदत घेऊन
करूया. तो पदार्थ मुलांच्या आवडीचा असेल तर फारच छान.
कधीतरी एकत्र बसून एखादा छान सिनेमा बघुयात.
सगळ्यांनी एकत्र बसून आपलं आपलं आवडतं पुस्तक वाचूया आणि जमल्यास वाचलेल्या
पुस्तकांविषयी चर्चा करूया. बघा कितीतरी गोष्टी सुचल्या. सगळ्यांनी मिळून विचार
केला तर अजूनही खूप कल्पना सुचतील.
या सगळ्याबरोबरच मुलांना त्यांचा असा वेळ पण
देऊया. कारण, आजपर्यंत त्यांना आपले पालक एवढा वेळ आपल्याबरोबर असायची सवय नाही.
त्यामुळे अजीर्ण होईल एवढा सहवासही नको. शिवाय मुलं नेहमी म्हणतात ना आम्हाला आमची
स्पेस हवी असते. मग ती स्पेस पण देऊया. आणि हो या स्पेस वर आपलं म्हणजे पालकांच्या
सूचनांचं अतिक्रमण नको. मुलांवर थोडं विश्वास ठेवायला हवा. त्यामुळे त्यांना थोडसं
मोकळं सोडणासुद्धा तितकंच गरजेचं आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी म्हणून जी सुट्टी
मिळालेली आहे, ती फक्त टी.व्ही. आणि व्हॉट्सअ अॅप वर येणाऱ्या बातम्यांमध्ये राहून
घरात नकारात्मक वातावरण निर्मिती करण्यापेक्षा घरातील संवाद वाढविण्यासाठी, घरातील
सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम करून
घरात सकारात्मक वातावरण निर्मिती करूया. वातावरण सकारात्मक असेल तर भीती
आणि चिंता यांचं सावट कमी होण्यास नक्की मदत होते.
