आपल्याला प्रवासात भरपूर वेगवेगळी लोक भेटतात. काही थोडे दिवस लक्षात राहतात काही कायमची लक्षात राहतात.
मी आणि मुक्ता दोन दिवस अमृतसरला गेलो होतो. रात्री एका ढाब्या मधून जेवून बाहेर पडलो आणि आता हॉटेलवर परत जाण्यासाठी रिक्षा बघत होतो. अमृतसरमध्ये तीन प्रकारच्या रिक्षा आहेत. एक आपली नेहमीची इंजिनवर चालणारी रिक्षा, दुसरी बॅटरीवरची रिक्षा आणि तिसरी सायकल रिक्षा. आम्ही जेवून बाहेर पडलो तेव्हा पावणे अकरा वाजले होते. मनामध्ये थोडीशी धाकधुक होती. पंजाब मधील एकदम अनोळखी शहर. रिक्षावाला कसा मिळेल काय माहित, असे काही प्रश्न मनात डोकावून गेले. इतक्यात एक बावीस तेवीस वर्षांची मुलगी आमच्या जवळ येत म्हणाली, 'ताई रिक्षा पाहिजे का, माझ्या रिक्षाने जाणार का? आम्ही काही क्षण विचार केला, तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं कि हि रिक्षा चालवत असेल. एकदम बारीक, जुने पुराणे कपडे घातलेली, थंडीने कुडकुडणारी. पण ती म्हणाली ताई चला ना माझ्या रिक्षामधून, मी तुम्हाला नीट तुमच्या हॉटेलवर सोडेन. आम्ही मनाचा निर्धार करून तिच्या रिक्षामध्य बसलो. तेवढ्या त्या १५ मिनिटांच्या प्रवासात तिने तिच्या बद्दल आम्हाला सर्व हकीकत सांगितली.
अमृतसरमध्ये ती एकमेव मुलगी आहे जी रिक्षा चालवते. सोनिया असं तिच नाव. एकदम बिनधास्त आणि प्रामाणिक मुलगी. आपण मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या बायका बघतो पण रिक्षा चालवणारी मुलगी आम्ही प्रथमच बघितली. पहिल्या दिवशी तिने आम्हाला सुखरूप आमच्या हॉटेलवर सोडलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मधर्म संयोगाने ती आम्हाला भेटली. पण या वेळी तिच्या रिक्षामध्ये आम्ही आणि अजून एक कुटुंब होत. तिने आता आपली सगळी कहाणी परत त्या नवीन कुटुंबाला ऐकवली. त्यांनी तिला विचारल एवढ्या रात्रीची रिक्षा चालवायला तुला भीती वाटत नाही का ग? ती म्हणाली, ती मला इथली लोक घाबरतात. लोक कितपत तिला घाबरतात ते माहित नाही पण इतर रिक्षावाले तिला मदत मात्र करत होते. ते दुसर कुटुंब जे आमच्याबरोबर होत, त्याच्या हॉटेलचा पत्ता तिला नीट माहित नव्हता, तिने एक दोन रिक्षावाल्यांना बोलावून नीट पत्ता विचारून घेतला. खरोखरच सोनिया एकदम धीराची आहे. रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ती रिक्षा चालवत असते. तेथील पोलीसही बहुतेक तिला व्यवस्थित ओळखत होते. तिने या सगळ्या लोकांना व्यवस्थित धरून ठेवले होते, अर्थातच त्यामुळे तिला हे काम करणे शक्य होते.
स्वतःच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिला हे काम कराव लागत. २०-२२ वर्षांची मुलगी पण जबाबदारीमुळे तिला केवढ मोठ बनवल. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, सोनियाला भेटल्यावर याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सोनाली... छान मांडलेस. सोनिया डोळ्यासमोर उभी राहिली.
उत्तर द्याहटवा