कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्।।
लहानपणी संध्याकाळचा परवचा (श्लोक, पाढे इ.) म्हणताना आणि सकाळी उठल्यावर हा श्लोक सवयीने म्हणत असू. आमच्या पिढीत काही अपवाद सोडले तर आई वडील, आजी आजोबा अशा वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितल की ते करायचं, का करायचं असं विचारायची पद्धत नव्हती आणि टाप ही नव्हती. कदाचित लहानपणी श्लोकाचा अर्थ समजत नसेल, पण पद्धत म्हणून म्हणत असू. जेव्हा कळायला लागल तेव्हा लक्षात आलं की दिवसभर या हातांनी आपण काम करणार आहोत त्याचे दिवसाच्या सुरुवातीलाच आभार मानायचे.
आता विचार केल्यावर जाणवत की आपण आपल्या शरीराला किती गृहीत धरतो. प्रत्येक अवयवांची कामं ठरलेली असतात आणि त्यांनी ती करायचीच असतात, त्याचा विचार तो काय करायचा?
परवा माझ्या सासऱ्यांचे एक मित्र आमच्याकडे आले होते. वय वर्ष 72 पण अजूनही सायकल चालवतात, गड चढायला जातात, दोन वर्षांपूर्वी तर ते everest base camp ला जाऊन आले. पण गेल्या आठवड्यात असाच काहीतरी पराक्रम करताना त्यांचा पाय दुखावला आणि डॉक्टरांनी सांगितलं की पायावर जास्त जोर द्यायचा नाही, त्यामुळे त्यांच्या सर्व पराक्रमांवर बंधन आली. बोलता बोलता ते म्हणाले की माझे पाय हे माझे गुलाम आहेत असंच मी त्यांना वागवत होतो. पण आता जेव्हा पाय दुखावल्याने सर्व बंधन आली त्यामुळे मी त्यांची काळजी घ्यायला लागलो.
खरंच आहे, आपल्या अवयवांची आपण काळजी तर घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर ते ज्या प्रकारे आपल्याला साथ देत असतात त्याची जाणीव ठेवून त्यांचे आभार मानायला पाहिजेत.
कोणत्याही क्षेत्रात उदाहरणार्थ खेळ, शिक्षण, कला, आपल्याला यश मिळाले की आपण त्याचे श्रेय आपण आपल्या कुटुंबियांना, गुरूंना देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. म्हणजे बघा हं एखाद्या खेळाडूने त्याच्या स्पर्धेमध्ये अपेक्षित यश मिळविले की तो खेळाडू त्याचे आई वडील, गुरू तसेच अजून ज्यांनी कोणी त्याला मदत केली असेल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. पण कधी असं आठवतंय का की त्या खेळाडूने त्याला योग्य अशी साथ दिल्याबद्दल त्याच्या पायांचे, श्वासाचे किंवा हातांचे आभार मानले आहेत. आता हे खेळाडू त्यांच्या त्यांच्या खेळाच्या गरजेनुसार त्या त्या अवयवांची नीट काळजी नक्कीच घेत असतील. पण जाणीवपूर्वक त्यांचे आभार मानणे हे किती जण करत असतील. हे एक उदाहरण झाल पण खेळाडूच का आपण सर्वसामान्य माणसे देखील आपल्या अवयवांकडून किती कामे करून घेतो. पण त्याची जाणीव आपल्याला असते का? घरात एकदा समारंभ असेल आणि सगळं छान सुरळीत पार पडलं की आपण ज्यांनी ज्यांनी त्या समारंभासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानतो कौतुक करतो पण आपल्या शरीराने दिलेली साथ त्याची जाणीव असते का आपल्याला? पण तेच समजा त्या समारंभाच्या दिवशी कमरेत ऊसण भरली आणि आपल्याला काम करण अशक्य झालं तर, तर आपण सगळं खापर त्या कमरेवर फोडतो. मग असं असेल तर मनाजोगते परिणाम मिळाल्यावर त्याच थोडसं श्रेय आपल्या शरीराला देऊन त्याचे आभार मानायला नकोत का?
आपण शांतपणे बसून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या शरीराला राबवून घेत असतो. आणि आपल्या कामाच्या नियोजनामध्ये या शारीरिक अवयवांच्या दुखण्या खुपण्याने काही गडबड झाली की आपल्याला किती त्रास होतो ? पण जर का आपल्याला आपल्या शरीराची वेळोवेळी मिळणारी साथ, होणारी मदत, याची जाणीव ठेवून त्यांची नीट काळजी घेत आलो तर आपलं शरीर आपल्याला उत्तम प्रकारे आणि कदाचित जास्त काळ साथ देऊ शकेल.
या सगळ्याचा विचार केल्यावर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या काही पारंपरिक गोष्टी, आपण काही जण परंपरा किंवा पद्धत म्हणून जरी करत असलो तरी त्या मागचं मला समजलेलं logic काहीसं वेगळं आहे, बघा तुम्हाला पटतं का ते…..
- सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा श्लोक कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम।।
या निमित्ताने आपण आपल्या हातांचे, ज्यांनी आपल्याला दिवसभर भरपूर काम करायचं आहे, दिवस सुरू होतानाच आभार मानत असतो.
- पूर्वीची लोकं अंघोळीच्या आधी सर्वांगाला तेल लावून छान सुगंधी उटण्याने अंघोळ करायची. अंघोळ करताना कंबर , पाठ गरम पाण्याने शेकून काढत.
ही दोन उदाहरणे, या आणि अशा अजूनही काही गोष्टी आहेत, सगळ्या इथे मांडणं शक्य नाही. पण या निमित्ताने ते आपल्या शरीराचे आभार मानत असत. त्यासाठी मुद्दाम वेळ देत असत.
आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात खरतरं आपलं शरीर जास्त तंदुरुस्त असायला हवं आणि त्यासाठी आपण त्याचे थोडे लाड पण केले पाहिजेत.
आपलं शरीर हे एका लहान मुलासारखं असतं. लहान मुलं कशी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर रडून, ओरडून आपलं लक्ष वेधून घेतात! तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. बऱ्याच वेळा असं होतं ना की सकाळी उठल्यावर एकदम हात दुखायला लागतो. करण काहीच नसतं. कधी कधी एकदम डोकं दुखायला लागतं. हं म्हणजे आता याला काहीतरी शास्त्रीय कारणं नक्की असतील पण आपलं शरीर आपल्याला आठवण करुन देत असतं की जरा माझ्याकडे पण लक्ष द्या. पण आपण इतके कठोर असतो की आपण, “जाऊ दे थांबेल थोड्या वेळाने”, अस म्हणून त्याकडे पण दुर्लक्ष करतो. पण तेच काहीतरी मोठा आजार झाल्यावर मात्र आपण अगदी इमाने इतबारे आपल्या शरीराची काळजी घेतो. बर झाल्याबद्दल आभार मानतो. पण हीच काळजी आपण कायम घेत राहिलो तर मोठ्या आजारांची शक्यता कमी करता येऊ शकेल कदाचित.
आज जेव्हा माझ्या सासऱ्यांचे हृदयाचे ऑपरेशन चालू आहे त्या वेळेला मला हे सगळे विचार आले. मी पण आजपर्यंत माझ्या शरीराला गृहीत धरूनच सगळ्या गोष्टी करते आहे, बहुतेक जरा जास्तच करते आहे. पण आता यापुढे मात्र त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न नक्की करेन.
आपल्या शरीराच्या कष्टांची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे, असं मला वाटतं. हे करण्यासाठी खूप काही वेगळं करावं लागतं नाही. योग्य वेळेला पोषक आणि योग्य असा आहार आपल्या शरीराला देणे. पुरेसा व्यायाम केला पाहिजे. शरीराला पुरेशी विश्रांती दिली पाहिजे म्हणजे पुरेशी झोप मिळाली पाहिजे. या आपण नक्की करू शकतो अशा गोष्टी आहेत. आणि हे करत असताना नकळत पणे आपण आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो.
या सगळ्या लेखाचा सारांश खरतर एका वाक्यात करता येईल. आपण नेहमी असं म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला सन्मान दिला पाहिजे, मग आपलं शरीर हे तर किती महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्या शरीराला पण आपण सन्मान दिला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा