बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

एक वेगळा अनुभव


आपल्याला प्रवासात भरपूर वेगवेगळी लोक भेटतात. काही थोडे दिवस लक्षात राहतात काही कायमची लक्षात राहतात.
मी आणि मुक्ता दोन दिवस अमृतसरला गेलो होतो. रात्री एका ढाब्या मधून जेवून बाहेर पडलो आणि आता हॉटेलवर परत जाण्यासाठी रिक्षा बघत होतो. अमृतसरमध्ये तीन प्रकारच्या रिक्षा आहेत. एक आपली नेहमीची इंजिनवर चालणारी रिक्षा, दुसरी बॅटरीवरची रिक्षा आणि तिसरी सायकल रिक्षा. आम्ही जेवून बाहेर पडलो तेव्हा पावणे अकरा वाजले होते. मनामध्ये थोडीशी धाकधुक होती. पंजाब मधील एकदम अनोळखी शहर. रिक्षावाला कसा मिळेल काय माहित, असे काही प्रश्न मनात डोकावून गेले. इतक्यात एक बावीस तेवीस वर्षांची मुलगी आमच्या जवळ येत म्हणाली, 'ताई रिक्षा पाहिजे का, माझ्या रिक्षाने जाणार का? आम्ही काही क्षण विचार केला, तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं कि हि रिक्षा चालवत असेल. एकदम बारीक, जुने पुराणे कपडे घातलेली, थंडीने कुडकुडणारी. पण ती म्हणाली ताई चला ना माझ्या रिक्षामधून, मी तुम्हाला नीट तुमच्या हॉटेलवर सोडेन. आम्ही मनाचा निर्धार करून तिच्या रिक्षामध्य बसलो. तेवढ्या त्या १५ मिनिटांच्या प्रवासात तिने तिच्या बद्दल आम्हाला सर्व हकीकत सांगितली.
अमृतसरमध्ये ती एकमेव मुलगी आहे जी रिक्षा चालवते. सोनिया असं तिच नाव. एकदम बिनधास्त आणि प्रामाणिक मुलगी. आपण मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या बायका बघतो पण रिक्षा चालवणारी मुलगी आम्ही प्रथमच बघितली. पहिल्या दिवशी तिने आम्हाला सुखरूप आमच्या हॉटेलवर सोडलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मधर्म संयोगाने ती आम्हाला भेटली. पण या वेळी तिच्या रिक्षामध्ये आम्ही आणि अजून एक कुटुंब होत. तिने आता आपली सगळी कहाणी परत त्या नवीन कुटुंबाला ऐकवली. त्यांनी तिला विचारल एवढ्या रात्रीची रिक्षा चालवायला तुला भीती वाटत नाही का ग? ती म्हणाली, ती मला इथली लोक घाबरतात. लोक कितपत तिला घाबरतात ते माहित नाही पण इतर रिक्षावाले तिला मदत मात्र करत होते. ते दुसर कुटुंब जे आमच्याबरोबर होत, त्याच्या हॉटेलचा पत्ता तिला नीट माहित नव्हता, तिने एक दोन रिक्षावाल्यांना बोलावून नीट पत्ता विचारून घेतला. खरोखरच सोनिया एकदम धीराची आहे. रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ती रिक्षा चालवत असते. तेथील पोलीसही बहुतेक तिला व्यवस्थित ओळखत होते. तिने या सगळ्या लोकांना व्यवस्थित धरून ठेवले होते, अर्थातच त्यामुळे तिला हे काम करणे शक्य होते.
स्वतःच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिला हे काम कराव लागत. २०-२२ वर्षांची मुलगी पण जबाबदारीमुळे तिला केवढ मोठ बनवल. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, सोनियाला भेटल्यावर याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शिक्षक दिन


शिक्षक दिन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे माजी राष्ट्रपती, यांचा जन्मदिवस, ते स्वतः एक उत्तम शिक्षक होते आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. 

खरोखरच शिक्षक होणे काही सोपे नाही. शिक्षक मुलांना स्वतःकडील शिदोरी देऊन संपन्न करत असतो. आणि त्यासाठी त्या शिदोरी बरोबरच मुलांविषयी प्रेम आणि आत्मियता या दोन्ही गोष्टी शिक्षकाकडे असणे अतिशय गरजेचे असते.
माझ्या संस्थेच्या, नूतन बाल शिक्षण संघाच्या शाळेत मला अजूनही काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इथे शिक्षकाकडे जी शिदोरी आहे त्यात मुलांना देण्यासाठी बरेच काही आहे. मुलांविषयी प्रेम आणि आत्मियता तर आहेच आहे. पण या सर्वांच्या आधी आपल्याकडे येणाऱ्या मुलांना हि शिदोरी आत्मसात करण्यासाठी आधी सक्षम करण्याची गरज आहे, याची जाणीव आमच्या शिक्षकांना आहे.
आमच्या संस्थेच्या शाळेत येणारे विद्यार्थी समाजाच्या ज्या स्तरातून येतात तिथे शिक्षणाचे महत्त्व माहित असलेली अशी फारच कमी कुटुंब आहेत. पण मुलांमधील क्षमता या समाजातील इतर मुलांप्रमाणेच असतात. मग या क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना तयार कारणे हे खूप अवघड काम आहे. पण आमचे शिक्षक हे काम अतिशय समर्थपणे करतात.
या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींमधून हे शिक्षक विविध साधने तयार करतात आणि या साधनांमधून मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण आणि शाळा या दोन्हीबद्दल आवड निर्माण होते. 
माझ्यामते आमच्या संस्थेच्या शाळेत येणाऱ्या मुलांना शैक्षणिक वातावरण जरी मिळत नसले तरी लहान वयात त्यांना मिळालेला जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव हा कदाचित आपल्यापेक्षा जास्त असतो. मग त्यांचे हे अनुभव जाणून घेवून त्यांना गाठीशी बांधून, त्यामध्ये शिक्षकाचे ज्ञान यांच्या एकत्र प्रयोगाने या मुलांना शिक्षण देता आले तर नक्कीच ते जास्त प्रभावशाली ठरते. आणि नेमके हेच आमच्या शिक्षकांनी जाणले. त्यामुळेच आज आमच्या शाळेतून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, सी.ए. वगैरे तर यशस्वीपणे होतातच. पण जेव्हा ते स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहतात तेव्हा पुन्हा एकदा मागे वळून शाळेत येऊन आपल्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करायला तयार असतात. 
मला अस वाटत, आमच्या सर्व शिक्षकांचे आणि संस्थेचे खरे यश यातच आहे. 
संस्थेतील सर्व शिक्षकांचे या शिक्षक दिनी मनापासून कौतुक !! 

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

आपलं घर

आपण अनेक अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमांबद्दल ऐकतो, वाचतो, कधी कधी प्रत्यक्ष बघायला जातो, त्यांना देणगी देतो. एवढाच काय तो आपला या सगळ्यांशी संबंध.

माझ्या समुपदेशन कोर्सचा एक भाग म्हणून आम्ही सर्व विद्यार्थिनी विजय फळणीकरांचा "आपल घर" हा आश्रम बघायाला गेलो. मी फक्त आश्रम अस एवढ्यासाठी म्हटलं कारण इथे वृद्ध माणसे आणि लहान मुले एकत्र राहतात. म्हणजे हा अनाथ बालवृद्धाश्रम आहे.

"आपलं घर" या नावातच आपुलकी आहे. तिथे गेल्यावर या आपलेपणाचा अनुभव सुद्धा आला. आपण स्वतःच घर जशा प्रकारे छान आणि नीटनेटके ठेवतो, शिवाय आपल्या घरातले सदस्य जसे एकमेकांशी वागतो, एकमेकांची काळजी घेतो, अगदी त्याच प्रकारे सगळं इथे बघायला मिळत.

फळणीकरांचे "आपलं घर" बघून आल्यावर फारच भारावून गेल्यासारखं वाटत, पण त्याहीपेक्षा जास्त परिणाम होतो तो त्यांचं पुस्तक 'पराजय नव्हे विजय' हे वाचल्यानंतर. यात फळणीकरांच्या बालपणापासून ते त्यांच्या आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे मांडला आहे. लहानपणापासून अनेक संकटांना समोर जात जात अतिशय धाडसी वृत्तीने आणि सकारात्मक विचारसरणीने फळणीकर अनेक दिव्यांतून गेले आहेत. पण या सगळ्या दिव्यांतून जात असताना त्यांनी त्यांची संवेदनशीलता आणि सदसद्विवेकबुद्धी कायम ठेवली.

फळणीकर दाम्पत्यावर झालेला सगळ्यात मोठा आघात म्हणजे त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे वैभव चे निधन. या आघाताने खचून गेलेल्या फळणीकरांनी यामधून बाहेर पाडण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबिला. "वैभव        ट्रस्ट" ची स्थापना करून लोकसेवेसाठी त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी एका रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली. ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांनी एक ड्राइवर ठेवला परंतु तो फक्त दिवसा काम करीत असे. मग जेव्हा जेव्हा रात्री बेरात्री रुग्णवाहिकेची गरज भासत असे तेव्हा फळणीकर स्वतः ती रुग्णवाहिका घेऊन जात असत. त्यावेळी त्यांना आलेले चित्तथरारक अनुभव वाचून आपण सुन्न होतो.

त्यानंतर "आपलं घर" सुरु करत असताना त्यांना आलेल्या अडचणी त्यावर त्यांनी शोधलेले उपाय आणि त्याचप्रमाणे काही हितचिंतकांनी त्यांना सढळ हस्ते केलेली मदत ही सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात नमूद केलेली आहे.

"आपलं घर" ची बांधणी खरच खूप छान आहे. वारजे इथे असलेला त्यांचा आश्रम हा फक्त मुलांसाठी आहे. आणि डोणजे (सिंहगड पायथा) येथे असलेली जागा बऱ्यापैकी विस्तारित आहे. येथे 10 आजी आजोबा आणि 35 मुलं मुली एकत्र राहतात. आपलं घर ही संस्था ज्या आजी आजोबांना किंवा मुलांना जवळचे असे कोणीच नाही अशांसाठी आहे. इथे राहणारे सर्व गरजू हे विनामूल्य राहतात. पण वैशिष्ट्य असे की तरीही इथले राहणीमान हे अतिशय उत्तम आहे. येथील स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे. फळणीकर म्हणतात 'हे विनामूल्य इथे राहतात म्हणून त्यांना आपल्याला कुठेतरी आणून टाकले आहे असे वाटता काम नये याची मी पूर्ण काळजी घेतो'. येथील आजी आजोबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की या लहान मुलांमुळे आम्हाला नातवंडांचं प्रेम मिळत. आम्ही त्यांची शक्य तेवढी काळजी घेतो त्याचप्रमाणे ही मुलं देखील आमची काळजी घेतात आणि आमची करमणूक करतात. आपलं घर मधील प्रत्येक मुलगा / मुलगी शाळेत जातात. या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा फळणीकरांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मोठी मुलं लहान मुलांना अभ्यासात मदत करतात.

आम्ही आपलं घर बघायला गेलो तो शनिवार होता, तेथील मंडळींकडून अस समजलं कि फळणीकर फक्त रविवारी येतात. परंतु योगायोगाने काही कामानिमित्त ते डोणज्याला आले आणि आम्ही त्यांना भेटू शकलो. अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्व!! त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा सगळा कर्मचारी वर्ग आपलं घर ची व्यवस्था उत्तम प्रकारे बघतात. आणि ते स्वतः संस्थेसाठी देणगी मिळावी या हेतूने वेगवेगळ्या लोकांच्या भेटीसाठी फिरत असतात आणि रविवारी मात्र या त्यांच्या परिवारासोबत वेळ घालविण्यासाठी नक्की डोणज्याला येतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर " मी आणि माझी झोळी असे आम्ही आठवडाभर फिरत असतो आणि रविवारी या सर्वांसोबत वेळ घालवायला इथे येतो'.

एवढ मोठं सामाजिक काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावातील नम्रता आणि साधेपणा बघून खरोखरच कौतुक वाटत. आजपर्यंत फळणीकरांना त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु मला अस वाटत आपलं घर येथील अबलवृद्धांकडून मिळणारे आशीर्वाद आणि मुलांकडून मिळणार भरघोस प्रेम हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.

विजय फळणीकरांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या, तसेच स्वतःच्या मुलाच्या निधनाच्या दुःखाच ओझं बाळगत असताना या अनाथ मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या साधनाताईंविषयी देखील मनापासून अभिमान वाटतो!!