सोमवार, २ जानेवारी, २०१७

गुरुकुल


मुल साधारण २ वर्षांची झाली की आई वडिलांची शाळाशोध मोहीम सुरु होते. पूर्वी इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम असा एकाच प्रश्न असायचा. पण सध्या, कोणते बोर्ड, साधी इंग्रजी माध्यम शाळा की कॉन्व्हेंट शाळा, असे भरपूर पर्याय आहेत. आणि जेवढे पर्याय जास्त तेवढाच गोंधळ जास्त.

२००७ मध्ये माझी मुल लहान असतानाच आम्ही मुंबईहून पुण्याला आलो. आमच्यापुढेसुद्धा हाच प्रश्न होता शाळा कोणती? मुलासाठी पहिलीत प्रवेश हवा होता आणि मुलीसाठी Junior K.G. CBSE शाळेत प्रवेश घ्यायचा हे नक्की होत. त्यामुळे पर्याय आपोआपच कमी झाले. गुरुकुल या शाळेबद्दल मी खूप जणांकडून ऐकल होत, शाळा खूप चांगली आहे आणि त्याची शिक्षणाची पद्धत खूपच वेगळी आहे. याच दरम्यान मी एक पुस्तक वाचल होत, “तोत्तोचान” अस त्या पुस्तकाच नाव. या तोत्तोचानमध्ये जशी आगगाडीच्या डब्ब्यांची शाळा आहे, त्याचप्रमाणे गुरुकुलमध्ये सुद्धा आगगाडीचे डब्बे आहेत अस ऐकल होत. म्हणून म्हटल जाऊन शाळा बघून यावी.

युनिव्हर्सिटी रस्त्यावर E स्क्वेअर मॉलच्या आधी एक गल्ली आहे त्या गल्लीच्या एकदम शेवटी ही शाळा आहे. शाळेच्या आजूबाजूला शेत आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न असा परिसर आहे. पहिल्याच दिवशी मी त्या परिसराच्या प्रेमात पडले. शाळा बघायला म्हणून गेलेलो पण प्रवेश अर्ज घेऊनच घरी आलो. सदाशिव पेठेत राहत असल्याने शाळा जरा लांब आहे अस वाटल पण तो परिसर इतका मोहक होता कि त्यापुढे अंतर फार नाही वाटल.

शाळेच्या प्रवेशाच्या पद्धतीप्रमाणे आम्ही अर्ज भरून दिला मग आम्हाला interview साठी बोलावलं. इथूनच शाळेच वेगळेपण जाणवू लागल. शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. मृण्मयी भावे. यांनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीच प्रश्न विचारणार नाही, आमची शाळा कशा पद्धतीने चालते याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारायचे. म्हणजे आम्हीच त्यांचा interview घेतला अस झाल. सौ. भावे यांनी आम्हाला शाळेच्या शिक्षण पद्धतीविषयी पूर्णपणे माहिती दिली. आम्ही पूर्ण शाळा बघितली, आणि शाळेत प्रवेश घेतला. दोन्ही मुलाचं शालेय जीवन सुरु झाला आणि आजही ते उत्तम प्रकारे चालू आहे. 

आज दहा वर्षांनतर जेव्हा माझा मुलगा दहावीत आहे तेव्हा मागे वळून बघताना शाळेनी आपली मुलांना काय दिल असा विचार मनात आला तेव्हा जाणवल की शिक्षणाबरोबर या शाळेनी आमच्या मुलांना खूप काही चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी शिकविल्या ज्या त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडतील. त्यापैकी एक तर Team Spirit किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणे, आणि Healthy Competition म्हणजे स्पर्धा करा पण ती इतरांशी न करता स्वतःशी करा. आपण जेव्हा स्वतःशी स्पर्धा करतो तेव्हा आपली खरी प्रगती होते.

आपण जेव्हा इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा त्यात फक्त समोरच्याला मागे कस टाकायच हे आपण बघतो आपण पुढे कस जायचा हा विचार तिथे नसतो. मुलांप्रमाणे पालकांना सुद्धा शाळेने किंवा मुलांनी शिकविले असे म्हणायला हरकत नाही की स्पर्धा ही माझी माझ्याशी आहे इतरांशी नाही. यामुळे आम्ही पालक सुद्धा मुलांना परीक्षेचे मार्क विचारताना इतरांना किती मिळाले अस विचारातच नाही फक्त आपल्या मुलाला/मुलीला किती मार्क मिळाले आणि वर्गाचा highest किती, एवढाच विचारल जातं. खरतर या दोनच प्रश्नांची उत्तर मिळतात अशी सवय आमच्या मुलांनी आम्हाला लावली आहे. आणि मला अस वाटत की हे अतिशय योग्य आहे. या मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील. मला जे येतंय त्याची बढाई न मारता माझ्या बरोबरच्यांना ते जमत नसेल तर त्यांना ते कस जमेल हे बघण्यात खरी हुशारी आहे हे आमच्या मुलांना कळलेल आहे. 

प्रत्येक शाळेच काही plus काही minus असतच, पण गुरुकुल कडून मिळालेली ही शिदोरी आमच्या मुलांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल यात शंका नाही.